Wednesday, 1 June 2022

चित्र-धून

 कधीकधी कविता बोलत नाही.. पण मनात काही तरी डहुळत असतं. व्यक्त होण्यासाठी आसुसलेली असतं.. अशा अस्वस्थ अवस्थेत रंग रेषांनी आधार दिला.. मूक झालेल्या अभिव्यक्तीला साकार केलं. सध्या शब्दांऐवजी चित्र-धून साद घालतेय...


Monday, 25 July 2016

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

madhyaseema.blogspot.com

उत्तरार्धानंतरच्या कविता..




उत्तरार्धानंतरच्या या कविता
‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’
या नावानं संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत.

प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.

मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.

प्रकाशन तिथी- मे २०१६.
भूमिका-

कविता ‘कवीचं नाव सोबत बाळगत असली तरी लिहून हातावेगळी झाल्यावर ती एका खोल अर्थानं कवीची राहात नाही.. फार काय ती त्यातल्या शब्दांचीही राहात नाही. कवी-मनातून बाहेर पडून शब्दांच्या रंगमंचावर कविता एकदा सादर झाली आणि पडदा पडला की पडलाच..! तिची नाळ तुटते. ती स्व-तंत्र होते. मुक्त होते कवीनं दिलेल्या आकारातून. रसिकवाचक जेव्हा त्या कवितेचा आस्वाद घेतो तेव्हा ती पुन्हा साकारते रसिक-मनात. तो तिचा नवा जन्म असतो!
कवितेचे हे जन्म.. विलय.. नवे जन्म म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ..! ती या जगड्व्याळात असतेही आणि नसतेही. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर अवचित कधीतरी कवीला दिसते आणि शब्दात प्रकाशित झाल्यावर रसिकालाही दिसू लागते..! मला दिसलेल्या काही कविता इथे सादर करतेय रसिकमनात पुन्हा जिवंत व्हाव्यात म्हणून, प्रतिसादाच्या अपेक्षेत..!

Saturday, 23 April 2016

भेटे नवी राई


naveerai.blogspot.com

नव्या पावलांनी । सजे पुन्हा भुई
भेटे नवी राई । नव्या जीवा

मनोगत
आतमधे मळभ असतंच. काहीतरी साचत असतं. रुजत असतं. उगवत असतं आतल्या आत. पण अनेक पावसाळे भोगून झाल्यानंतर रुजण्या-उगवण्याचे, फुलण्या-गळण्याचे नावीन्य ओसरते. नकळत एक तटस्थ अवस्था येते. किंवा मख्ख थकलेपण. पिकलेली फळं पडतात आतल्या आत पण ती उचलून कुणाला द्यावी-दाखवाविशी वाटत नाहीत..!

पण अचानक मरगळ वितळते. चक्राकार गतीत फिरणार्‍या त्याच त्या घटनांमधे ताजेपण जाणवतं. तो क्षण नवी राई भेटवणारा असतो. तिचं हिरवेपण लपेटून मळभही बोलू लागतं... साचलेलं सगळं नव्या ऊर्जेसह उगवू लागतं कवितांमधून..

नव्या राईत भेटलेल्या नव्या कविता इथे सादर करतेय- 

Sunday, 27 March 2016

पंख फुटल्यावर...!


pankhaphutale.blogspot.com


किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या कविता...

मुलगी अगदी तहानी, दोन-तीन महिन्यांची असताना आई हेच तिचं जग असतं. हळू हळू मोठी होत ती किशोर वयाची झाल्यावर, तिचं जग स्वतंत्र झाल्यावर हे नातं कसं पूर्ण बदलतं त्याचा छोटासा आलेख मांडणार्‍या कविता... व इतर काही कविता

Saturday, 26 March 2016

रूपांतर : एक रियाज


riyajshabdancha.blogspot.com

संहिता-रूपांतर म्हणजे केवळ भाषांतर नाही. तो एक आंतरिक रियाज असतो शब्दांचा आकलन-यात्रा घडवणारा.

भूमिका-

एकदा एका मैत्रिणीला चांगदेवपासष्टी समजून घ्यायची होती. ती माझ्याकडे आली. पण मला तरी कुठं कळली होती? त्या निमित्तानं मी ती समजून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. एकेका ओवीचा समजलेला आशय नोंदवत राहिले. विशेष म्हणजे ही नोंद अभंग छंदात होऊ लागली. काही काळ या रूपांतर-प्रक्रियेत बुडून गेले होते. जे मला उमगलं आणि जे शब्दांकित होत गेलं ते परिपूर्ण नसणार... पण त्यातून मला अवर्णनीय आनंद मिळाला.

एवढंच नाही तर हेही उमगलं की महत्त्वाची संहिता आकळून घेण्याचा हा एक सर्जक असा सुंदर मार्ग आहे. कुठेतरी वाचलेलं की ‘translation is an intense way of reading..' याचा प्रत्यय मला आला.

अशा अनुभवातून, स्वांतःसुखाय केलेली काही रूपांतरं इथे सादर करतेय-



माझ्या डायरीतून...


nondee.blogspot.com  

अंतर्मुख क्षणी वेळोवेळी हाती आलेल्या उत्कट समजूतीच्या काही नोंदी... अल्पायुषी का असेनात पण यांनी मला पुनर्जन्माचा आनंद दिलाय.

मनोगत-

घड्याळाचे तीनही काटे
बारावर असण्याचा हा क्षण
३१ डिसेंबरच्या रात्रीचा आहे.
माझ्या शेजारी रेडिओ लागलेला आहे.
निवेदिका नववर्षाच्या शुभेच्छा देतेय.
बाहेर जल्लोष चाललाय...
फटाक्यांचे छाती धसकवणारे आवाज
आणि खिडक्यांच्या काचेवर आदळून परतणारा प्रकाश
रात्रीला झोपू देत नाहीए.

पाठ दुखतेय.
वेदना हळू हळू हातातही पसरतेय.
माझे चित्त विखुरलेय या सार्‍यात.
उडालेल्या फटाक्यांच्या कागदासारखे.
पाठ दुखतेय... जास्तीच.
पण मन घोटाळले नाही
पाठीच्या आगेमागे तर दुखणं राहील
दुखण्याच्या मर्यादित आकाराएवढं...!

भोवतीच्या या गलक्यातही
चित्तात उमटतेय व्याख्या मुक्त क्षणाची...
पण ती व्याख्या शब्दात टिपण्याच्या नादात
अनुभूतीची चव मी घेतली की नाही
आता आठवत नाहीए...!

जगण्याची समज वाढवणारे
असे किती पुनर्जन्म
मुरत राहतात आतल्या आत
आपल्या नकळत..!
त्यांना नसतो नवा देह
नसते वेगळे नाव.. वेगळी ओळख..
आणि नसते आयुष्यही..!  

***  



शब्दांचा जोगवा

jogavaa.blogspot.com

शब्द घालतील । शब्दांचा जोगवा । प्रचितीच्या गावा । जाण्यासाठी..!

भूमिका-

     जीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणंअधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकसअधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत.

     म्हणून सतत शब्दांशी सलगी करत लेखन-प्रक्रिया आतून अनुभवत राहावं. केव्हातरी प्रसन्न होऊन शब्द घालतील शब्दांचा जोगवा प्रचितीच्या गावा जाण्यासाठी.

      या भूमिकेतून वेळोवेळी लिहित राहिलेय.. ते लेख इथे सादर करतेय.