Saturday, 26 March 2016

कवितेच्या आगेमागे

aagemage.blogspot.com

दिवाळी अंक, वृत्तपत्र, संपादित पुस्तके, स्मरणिका यासाठी लेख.. साहित्यसंमेलनात भाषण, चर्चासत्रात निबंध, पुस्तक परिचय, प्रस्तावना... अशा वेगवेगळ्या निमित्ताने केलेले गद्य लेखन... बहुतेक सर्व लेखन कवितेच्या संदर्भात केलेले आहे..


एका कडेवर ऊन
एका कडेवर वारा
झाड मौनाचे डोलते
देत भुईला निवारा

पहाटेची किलबिल
याला भूपाळी म्हणते
परतल्या पाखरांना
तेही कुशीमध्ये घेते

सार्‍या विश्वाचेच आर्त
साठवून आत आत
पाखरांच्या सोबतीनं
झाड झाडात निवांत

पाखरांच्या येरझारा
झाड सदाचेच जागे
सृजनाचे सत्त्व जसे
कवितेच्या आगेमागे..!


Friday, 25 March 2016

ज्ञानेश्वरीतील उपमा



ज्ञानेश्वरीतील उपमांना दृश्यस्वरूप देण्याचा अल्पसा प्रयत्न...


आनंदाचा अनुकार-

ज्ञानेश्वरीतील उपमा दृश्यरूपात मांडण्याची कल्पना सुचली ती एका स्वांतःसुखाय चालू असलेल्या छंदातून..

आधुनिक मोबाईलच्या अनेक सुविधांमधली छायाचित्र काढता येणं ही सुविधा मला सर्वात अधिक मोहवून टाकणारी वाटलीय. बाहेर पडलं की लगेच माझी नजर भिरभिरू लागते. काही वेगळं, सुंदर दिसलं की ते आधी नजर टिपते मग मोबाईलमधला कॅमेरा.. स्वतःला आनंद देणारे असे फोटो एकाच वेळी अनेकांशी शेअर करणंही आता अगदी सहज होऊ शकतं. एकदा एका फोटोखाली अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. खूप छान वाटलं. मग फोटो आणि दोन ओळी शेअर करणं हा रोजचा कार्यक्रमच झाला. प्रतिसादही चांगला मिळाला... अभिव्यक्तीची एक नवी शैलीच सापडल्यासारखं झालं..!

एकदा एका फोटोवर दोन ओळी लिहिताना त्यात ज्ञानेश्वरीतली, मनात रेंगाळलेली ‘आनंदाचा अनुकार’ ही उपमा वापरली गेली. खरंतर तो फोटो काढताना ती उपमाच दृश्य रूपात समोर साकारलीय असं जाणवलं... सकाळचं प्रसन्न निळं आकाश. दाट झाडी असलेलं क्षितिज आणि त्या दोन्हीचं जलाशयात पडलेलं प्रतिबिंब.. नजर न हलवता टिपलं ते दृश्य.. आणि त्या खाली लिहीलं- ‘अनुपम्य सृष्टी खेळ निर्मात्याचा / जणू आनंदाचा अनुकार..!’ यात फक्त ओवीतली उपमा आहे. हा ओवीचा अनुवाद नाही...

मनात आलं,ज्ञानेश्वरीतल्या उपमांना छायाचित्रांच्या माध्यमातून असं दृश्य रूप देता आलं तर? त्या उपमा, त्यांचा संदर्भ आणि तत्त्वविचार सर्वच समजून घ्यायला मदत होईल. मग मला विशेष भावलेल्या उपमा जाणीवपूर्वक दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमेला साजेसा फोटो, माझ्या दोन ओळी आणि खाली ज्ञानेश्वरीतली ती उपमा असलेली ओवी, तिचा अर्थ आणि संदर्भ लिहिणं असा उपक्रम सुरू झाला... तो आपल्या समोर ठेवते आहे-


प्रत्ययाचे बिंब

pratyayachebimb.blogspot.com

दृश्य – दोनोळी

प्रत्ययांविषयी-

रोज सकाळी फिरताना जवळ फोन असतो. नजरेला दिसत असतात असंख्य दृश्यं. त्यातलं एखादं दृश्य पाऊल पुढं पडू देत नाही. कधी त्यातलं सौंदर्य मोहवतं तर कधी वेगळेपण.. मग ते टिपलं जातं. ही निवड अगदी सहज आणि निर्हेतुक असते. आवडलेला फोटो मोबाइलचा वॉलपेपर बनतो. सुप्रभात म्हणून कुणाकुणाला पाठवला जातो. फोटोखाली एकदा अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. छान वाटलं. प्रतिसादही छान मिळाला. मग हा छंद अभिव्यक्तीची शैली म्हणून मनात रुजू झाला.

या ओळी सुचणं म्हणजे एका परीनं तो फोटो समजणं... किंवा फोटोच्या माध्यमातून आतलं आकलन स्पष्ट होणं.... काही ओळींमधे निखळ सौंदर्याचा आस्वाद घेतला गेला आहे. काहींमधे काहीसं तत्त्वचिंतन जाणवू शकेल. तर काहीत सामाजिक स्थितीची बोच व्यक्त झालीय... फोटो पाहून प्रत्येकाला वेगळा प्रत्यय येऊ शकेल. ‘प्रत्ययाचे बिंब’ नावानं मला आलेले प्रत्यय इथे शेअर करतेय...




Thursday, 24 March 2016

Thoughts in a Nutshell by L.K.Apte


thoughtsbylka.blogspot.com

This Nutshell contains cream thoughts, covering whole of the human life..


लक्ष्मण केशव आपटे- माझे वडील. ते सतत काहीतरी लिहीत वाचत असायचे. लेखन स्फुट स्वरूपाचं असायचं आणि वाचन अध्यात्मिक ग्रंथांचं. स्वगत चिंतन केल्यासारखं लेखन. अध्यात्म हाच विषय. बहुतेक लेखन इंग्रजीत होतं. तेव्हा आम्ही भावंडं लहान होतो. त्यांनी लिहिलेलं फारसं कधी वाचायला मिळालं नाही. काही दिवसांपूर्वी अचानक, त्यांनी १९७२ च्या सुमारास कागदाच्या २० फुटी पट्टीवर लिहिलेल्या १६० विचारांची एक गुंडाळी (त्यांनी याला nutshell म्हटलंय) मला मिळाली. माझी बहीण प्रतिभा गोरे हिनं ती जपून ठेवली होती. मला खजिना सापडल्याचा आनंद झाला. जीर्ण व्हायला लागलेल्या त्या गुंडाळीतले मिळाले तेवढे विचार मी सलग लिहून काढले. मग जमेल तसं त्यातला एकेक विचार त्यातील आशयाला साजेशा फोटोवर लिहून अभंग छंदातील दोन ओळीत केलेला त्याचा स्वैर भावानुवाद त्याखाली लिहीत गेले... वडिलांचे हे विचारधन आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न-