Friday, 25 March 2016

ज्ञानेश्वरीतील उपमाज्ञानेश्वरीतील उपमांना दृश्यस्वरूप देण्याचा अल्पसा प्रयत्न...


आनंदाचा अनुकार-

ज्ञानेश्वरीतील उपमा दृश्यरूपात मांडण्याची कल्पना सुचली ती एका स्वांतःसुखाय चालू असलेल्या छंदातून..

आधुनिक मोबाईलच्या अनेक सुविधांमधली छायाचित्र काढता येणं ही सुविधा मला सर्वात अधिक मोहवून टाकणारी वाटलीय. बाहेर पडलं की लगेच माझी नजर भिरभिरू लागते. काही वेगळं, सुंदर दिसलं की ते आधी नजर टिपते मग मोबाईलमधला कॅमेरा.. स्वतःला आनंद देणारे असे फोटो एकाच वेळी अनेकांशी शेअर करणंही आता अगदी सहज होऊ शकतं. एकदा एका फोटोखाली अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. खूप छान वाटलं. मग फोटो आणि दोन ओळी शेअर करणं हा रोजचा कार्यक्रमच झाला. प्रतिसादही चांगला मिळाला... अभिव्यक्तीची एक नवी शैलीच सापडल्यासारखं झालं..!

एकदा एका फोटोवर दोन ओळी लिहिताना त्यात ज्ञानेश्वरीतली, मनात रेंगाळलेली आनंदाचा अनुकारही उपमा वापरली गेली. खरंतर तो फोटो काढताना ती उपमाच दृश्य रूपात समोर साकारलीय असं जाणवलं... सकाळचं प्रसन्न निळं आकाश. दाट झाडी असलेलं क्षितिज आणि त्या दोन्हीचं जलाशयात पडलेलं प्रतिबिंब.. नजर न हलवता टिपलं ते दृश्य.. आणि त्या खाली लिहीलं- अनुपम्य सृष्टी खेळ निर्मात्याचा / जणू आनंदाचा अनुकार..!यात फक्त ओवीतली उपमा आहे. हा ओवीचा अनुवाद नाही...

मनात आलं,ज्ञानेश्वरीतल्या उपमांना छायाचित्रांच्या माध्यमातून असं दृश्य रूप देता आलं तर? त्या उपमा, त्यांचा संदर्भ आणि तत्त्वविचार सर्वच समजून घ्यायला मदत होईल. मग मला विशेष भावलेल्या उपमा जाणीवपूर्वक दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमेला साजेसा फोटो, माझ्या दोन ओळी आणि खाली ज्ञानेश्वरीतली ती उपमा असलेली ओवी, तिचा अर्थ आणि संदर्भ लिहिणं असा उपक्रम सुरू झाला... तो आपल्या समोर ठेवते आहे-


No comments:

Post a Comment